अखिलेश यादव यांची उपरोधिक टिप्पणी
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेशच्या कटनी येथे पक्षाचे उमेदवार शंकर महतो यांच्या प्रचाराकरता सभा घेतली आहे. या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना लक्ष्य केले आहे. कमलनाथ यांनी आमच्या पक्षाबद्दल काहीतरी वक्तव्य केले आहे, परंतु त्यांचे वय अधिक असल्याने ते नीटप्रकारे आमचे नाव घेऊ शकले नसतील, ही त्यांची चूक नसून वयामुळे घडले असावे अशी उपरोधिक टीका अखिलेश यांनी केली आहे.
काँग्रेसच्या घोषित मुख्यमंत्रिपदाच्या दावेदाराच्या नावातच कमळ आहे. त्यांच्या नावातच भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते इंडिया आघाडीत फूट पाडू आहेत. राज्यातील नेते दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यानुसारच हे करत असावेत. काँग्रेस उत्तरप्रदेशात भाजपची बी टीम म्हणून काम करते असा दावा अखिलेश यांनी केला आहे.
भाजप शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगायचा, परंतु आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही. आज शेतकरी दु:खी असून पिकाला बाजारात योग्य भाव नाही. मध्यप्रदेशात सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. मध्यप्रदेशातच महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कुठलेच पाऊल उचलले नाही असा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
समाजवादी पक्ष हा घटक पक्ष व्हावा अशी काँग्रेसचीच इच्छा नाही. काँग्रेस तर आम आदमी पक्षाच्या विरोधातही भूमिका मांडत आहे. काँग्रेसकडे छोट्या पक्षांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संधी होती, परंतु काँग्रेसला जनता सोबत असल्याचा भ्रम झाला आहे. आगामी काळात कुठली आघाडी झाल्यास त्यात दलित आणि आदिवासींची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कुठलीही आघाडी दलित आणि आदिवासींना बाजूला सारून होऊ शकत नसल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.









