वृत्तसंस्था / मोहाली
अनमोलप्रित सिंगच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाब संघाने अंतिम सामन्यात बडोदा संघाचा 20 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 बाद 223 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर बडोदा संघाने 20 षटकात 7 बाद 203 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पंजाब संघाच्या डावात अनमोलप्रित सिंगने 61 चेंडूत शानदार 113 धावा झोडपल्या. पंजाब संघातील नेहाल वधेराने 27 चेंडूत जलद नाबाद 61 धावांची खेळी केली. अनमोलप्रित सिंगने 58 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पंजाबची स्थिती 2 बाद 18, अशी केवीलवानी होती. त्यानंतर अनमोलप्रित सिंग आणि कर्णधार मनदीप सिंग यानी संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. मनदिप सिंगने 23 चेंडूत 32 धावा झोडपल्या. पहिल्या 10 षटकात पंजाबने 80 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे कृणाल पांड्याने 30 धावात 1 गडीबाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बडोदा संघाने 20 षटकात 7 बाद 203 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 20 धावांनी गमवावा लागला. बडोदा संघातील ए रजपूतने 61, निनाद रथवाने 47, कृणाल पांड्याने 45 धावांचे योगदान दिले. पंजाबच्या अर्शदिप सिंगने 23 धावात 4 गडीबाद केले. या स्पर्धेत 2011-12 साली अंतिम सामना बडोदा संघाने पंजाबचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते.
संक्षिप्त धावफलक : पंजाब : 20 षटकात 4 बाद 223 (अनमोलप्रित सिंग 113, नेहाल वधेरा नाबाद 61, कृणाल पांड्या 1-30), बडोदा 20 षटकात 7 बाद 203 (ए. रजपूत 61, निनाद रथवा 47, कृणाल पांड्या 45, अर्शदिप सिंग 4-23)









