वृत्तसंस्था/ सिडनी
रविवारी येथे झालेल्या सिडनी मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या इथोपियाचा किरोस आणि नेदरलँड्सची सिफान हसन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागात जेतेपद पटकाविले. जागतिक मॅरेथॉन क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या सिडनी मॅरेथॉनमध्ये जगातील सुमारे 35 हजार धावपटूंनी आपला सहभाग दर्शविला. पुरुषांच्या विभागात इथोपियाचा 28 वर्षीय किरोसने 2 तास, 6 मिनिटे आणि 6 सेकंदाचा अवधी घेत जेतेपद पटकाविले. इथोपियाच्या अॅडेसू गोबेनाने दुसरे स्थान तर लिसोथोच्या टेबेलो रेमकोंगनाने तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात नेदरलँड्सच्या सिफान हसनने 2 तास 18 मिनीटे आणि 22 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकावताना इथोपियाच्या इडेसाचा गेल्यावर्षी नोंदवलेला जलदवेळेचा विक्रम मोडीत काढला. केनियाच्या कोसगेईने 2 तास 18 मिनीटे आणि 56 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर ईडेसाने तिसरे स्थान मिळविले. सिडनी मॅरेथॉनमध्ये केनियाच्या अव्वल स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. पण पुरुषांच्या विभागात केनियाचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता किपचोगीला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सिडनी मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिलांच्या व्हिलचेअर गटामध्ये स्विसच्या मार्सेल हगने तर महिलांच्या विभागात अमेरिकेच्या सुसाना स्केरोनीने जेतेपद पटकाविले.









