वृत्तसंस्था / माँट्रियल (कॅनडा)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या नॅशनल बँक खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डेन्मार्कच्या क्लारा टॉसनने पोलंडची द्वितीय मानांकीत विम्बल्डन विजेती इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
हार्डकोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत क्लारा टॉसनने द्वितीय मानांकीत स्वायटेकचा 7-6 (7-1), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत एकेरीच्या शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. आता मंगळवारी टॉसनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या मॅडीसन किजबरोबर होणार आहे. मॅडिसन किजने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद चालू वर्षाच्या टेनिस हंगामात मिळविले आहे. गेल्या जानेवारीमध्ये टॉसनने डब्ल्यूटीए टूरवरील एकमेव टेनिस स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकेच्या मॅडिसन किजने झेकच्या 11 व्या मानांकित कॅरोलिन मुचोव्हाचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लॅटव्हियाच्या सेव्हास्टोव्हाचे आव्हान जपानच्या ओसाकाने केवळ 49 मिनिटांत 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले. युक्रेनच्या इलिना स्वीटोलिनाने अमेरिकेच्या अॅनिसिमोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. कॅनडाची 18 वर्षीय मुबोको आणि स्पेनची मॅनिरिओ तसेच युक्रेनची कोस्ट्युक आणि कझाकस्थानची रायबाकिना यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील.









