मिळकतधारकांकडून घरपट्टी भरण्यासाठी धडपड : पहिल्या दिवशी 52 लाखांचा महसूल जमा
बेळगाव : महापालिकेकडून 2025-26 या नवीन आर्थिक वर्षापासून 4 टक्के घरपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 5 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याने तत्पूर्वी घरपट्टी भरण्यासाठी शहरातील मिळकतधारकांची धडपड सुरू आहे. त्याचबरोबर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरपट्टीवर 5 टक्के सवलत दिली जात असल्याने मंगळवारी पहिल्या दिवशी घरपट्टीच्या माध्यमातून तब्बल 52 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. बेळगावात 1 लाख 58 हजार 524 इतक्या मिळकती आहेत.
त्यापैकी 88,883 मिळकतधारकांनी 2024-25 आर्थिक वर्षात घरपट्टी भरली आहे. तर 69 हजार 641 मिळकतधारकांनी घरपट्टी भरलेली नाही. गतवर्षी महापालिकेच्या महसूल विभागाला 73 कोटी 50 लाख रुपयांची घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र महसूल विभागाने 31 मार्च 2025 पर्यंत 69 कोटी 52 लाख इतकी घरपट्टी वसूल केली आहे. दरवर्षी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महसूल विभागाला दिले जाते. मात्र ते साध्य होत नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच घरपट्टी थकविणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासह थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गतवर्षी मोठमोठ्या थकबाकी धारकांकडून घरपट्टी वसूल केली होती. 2023 मध्ये महापालिकेने घरपट्टीत वाढ केली होती. त्यानंतर 2024 मध्ये राज्यात रेडीरेकनरचे दर वाढल्याने पुन्हा घरपट्टीत वाढ करण्यात आली. त्यानंतर आता 2025-26 या नवीन आर्थिक वर्षात 4 टक्के घरपट्टी वाढविण्याचा निर्णय अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदर निर्णयावर शनिवार दि. 5 रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे घरपट्टी वाढण्यापूर्वीच मिळकतधारकांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरपट्टी भरण्यासाठी धडपड सुरू आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच बेळगावकरांना 5 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
आर्थिक वर्षाच्या एप्रिलच्या पहिल्या महिन्यात घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे मंगळवारी पहिल्याच दिवशी मनपा तिजोरीत तब्बल 52 लाखाचा महसूल जमा झाला आहे. जून महिन्यापासून घरपट्टीवर दंड आकारला जातो. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात दंडाची ही रक्कम 2 टक्क्यांनी वाढत जाते. त्यामुळे एप्रिलमध्येच सवलतीच्या दरात घरपट्टी भरण्यासाठी मिळकतधारकांची धडपड सुरू आहे. शनिवारपासून घरपट्टीत पुन्हा 4 टक्के वाढ होणार असल्याने बहुतांश जण ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे घरपट्टी भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नवीन आर्थिक वर्षात घरपट्टी भरून घेण्यास सुरुवात
2025-26 या नवीन आर्थिक वर्षाची घरपट्टी भरून घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंत घरपट्टी भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. पहिल्याच दिवशी 52 लाख रुपयांचा महसूल घरपट्टीच्या माध्यमातून जमा झाला आहे.
-संतोष अनिशेट्टर (प्रभारी महसूल उपायुक्त)









