वृत्तसंस्था/ मेट्झ (फ्रान्स)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मेट्झ पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाने रशियाच्या माजी टॉप सीडेड डॅनिल मेदवेदेव्हला पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात वावरिंकाने मेदवेदेव्हचे आव्हान 6-4, 6-7 (7-9), 6-3 असे संपुष्टात आणले. मध्यंतरी वारंवार दुखापतीमुळे वावरिंकाला टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. त्याने आपल्या टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत तीन ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. 2021 च्या संपूर्ण वर्षामध्ये त्याला या दुखापतीने चांगलेच ग्रासले होते. मेट्झमधील सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱया एका सामन्यात द्वितीय मानांकित हुरकेझने ऑस्ट्रियाच्या तसेच माजी अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या थिएमचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. वावरिंकाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना स्वीडनच्या मायकेल येमेरशी होणार आहे.









