ग्रीकस्पूर, कॉलिन्स, ब्युकेसा, कोस्टय़ुक, जेबॉर यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत शुक्रवारी पुरुष एकेरीत ग्रीकचा स्टिफॅनोस सित्सिपेस, इटलीचा सिनेर त्याचप्रमाणे महिला विभागात पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची कोको गॉफ, जेसिका पेगुला, जपानची निशिओका यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. हॉलंडचा ग्रीकस्पूर, ब्युकेसा, कोस्टय़ुक यांचे आव्हान मात्र समाप्त झाले. ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठताना कोकेनाकिसचा पराभव केला. मात्र, टय़ुनिशियाच्या जेबॉरचे आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले.
शुक्रवारी पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपेसने हॉलंडच्या गीकस्पूरचा 6-2, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. ग्रीकच्या तृतीय मानांकित सित्सिपेसने अद्याप या स्पर्धेत पहिल्या तीन फेऱयांमध्ये एकही सेट गमावलेला नाही. स्पेनचा माजी टॉप सीडेड आणि विद्यमान विजेता राफेल नदाल आणि नॉर्वेचा कास्पर रुड यांचे आव्हान मात्र यापूर्वीच समाप्त झाले आहे. सित्सिपेसचा पुढील फेरीतील सामना इटलीच्या झेनिक सिनेरशी होणार आहे. इटलीच्या पंधराव्या मानांकित सिनेरने हंगेरीच्या मार्टोन फ्युकसोव्हिक्सवर 4-6, 4-6, 6-1, 6-2, 6-0 अशा पाच सेट्समधील लढतीत मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनच्या नदालला पराभूत करणाऱया मॅकेन्झी मॅकडोनाल्डचे आव्हान तिसऱया फेरीत जपानच्या निशिओकाने संपुष्टात आणले. निशिओकाने मॅकडोनाल्डचा 7-6 (8-6), 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेने शुक्रवारी पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या कोकेनाकिसचा 4-6, 6-7 (4-7), 7-6 (5-7), 6-3, 7-5 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव केला. हा सामना पावणे सहा तास चालला होता. मरेच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा सर्वात दीर्घकालीन सामना ठरला. मरेचा हा 250 वा सामना होता. सहाव्या मानांकित फेलिक्स ऍलिसिमेने फ्रान्सिस्को सेरुनडोलोवर 6-1, 3-6, 6-1, 6-4 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

महिलांच्या एकेरीतील शुक्रवारी झालेल्या तिसऱया फेरीतील सामन्यात पोलंडच्या टॉप सीडेड इगा स्वायटेकने ख्रिस्टिना ब्युकेसाचा 6-0, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथी फेरी गाठली. स्वायटेकने यापूर्वी फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम आणि अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या इलिना रिबेकिनाने डॅनिली कॉलिन्सचा 6-2, 5-7, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या पेगुलाने मार्टा कोस्टय़ुकचा 6-0, 6-2 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको गॉफने आपल्याच देशाच्या बर्नांडा पेराचा 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 2022 साली या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविणाऱया बार्बोरा पेसिकोव्हाने ऍनिलिना कॅलिनिनाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. आता पेसिकोव्हा आणि पेगुला यांच्यात चौथ्या फेरीतील सामना होणार आहे. 18 वषीय कोको गॉफचा चौथ्या फेरीतील सामना ओस्टापेंकोशी होणार आहे. झेकच्या मार्केटा व्होंड्रोसोव्हाने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविताना टय़ुनिशियाच्या जेबॉरचे आव्हान 6-1, 5-7, 6-1 असे संपुष्टात आणले. स्वीसच्या बेन्सिकने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या क्लेरी लियुचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव केला.









