वृत्तसंस्था/ रोम
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या इटालियन खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. तसेच पुरूष विभागात अमेरिकेच्या टॉमी पॉलने उपांत्य फरीत प्रवेश मिळविताना पोलंडच्या हुरकेझचा पराभव केला.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वायटेकने अमेरिकेच्या तृतीय मानांकित गॉफचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. साबालेंका आणि कॉलिन्स यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना शनिवारी खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूंबरोबर स्वायटेकची जेतेपदासाठी लढत होईल. स्वायटेकला माद्रिद-रोम टेनिस स्पर्धा जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी स्वायटेकने माद्रिद टेनिस स्पर्धा जिंकली होती.
पुरुषांच्या विभागात अमेरिकेच्या 14 व्या मानांकित टॉमी पॉलने पोलंडच्या सातव्या मानांकित हुरकेझचा 7-5, 3-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत टॉमी पॉलने यापूर्वीच्या सामन्यात रशियाच्या विद्यमान विजेत्या मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का दिला होता. या स्पर्धेत ग्रीसचा सित्सिपस, चिलीचा निकोलस जेरी आणि तेबिलो यांनी यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे.









