वृत्तसंस्था/ मॅसन (ओहिओ)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या सिनसिनॅटीक खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत इटलीचा जेनिक सिनेर तसेच महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक यांनी एकेरीत उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जेनिक सिनेरने रशियाच्या रुबलेव्हचा 4-6, 7-5, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. गेल्या आठवड्यात झालेल्या माँट्रियलमधील स्पर्धेत रुबलेव्हने सिनेरचा पराभव केला होता. आता सिनेरने या मागील पराभवाची परतफेड सिनसिनॅटी स्पर्धेत केली. आता सिनेर आणि जर्मनीचा तृतीय मानांकित व्हेरेव यांच्यात उपांत्य सामना होईल. व्हेरेवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शेल्टनचा 3-6, 7-6, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या टिफोईने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी हुरकेज दुसरा सेट चालू असताना जखमी झाला. त्यामुळे त्याने हा सामना अर्धवट सोडला. आता टिफोईचा उपांत्य फेरीचा सामना रुने आणि ड्रेपर यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या स्वायटेकने आपली विजयी घोडदौड कायम राखताना 17 वर्षीय मीरा अँड्रीव्हाचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव केला. आता स्वायटेक आणि साबालेंका यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. साबालेंकाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सॅमसोनोव्हावर 6-3, 6-2 अशी मात केली. महिलांच्या विभागातील अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने कॅनडाच्या लैला फर्नांडीझचा 6-2, 6-7, 7-6 तर दुसऱ्या एका सामन्यात बेडोसाने पॅव्हेलचेंकोव्हाचा 6-3, 6-2 असा फडशा पाडत उपांत्यफेरी गाठली. पेगुला आणि बेडोसा यांच्यात सोमवारी उपांत्य फेरीचा सामना होईल.









