वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील टिळक नगर येथील एमसीडी शाळेबाहेर सापडलेला मृतदेह स्वित्झर्लंडमधील महिलेचा असल्याचे समोर आले आहे. या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरप्रीत नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने सदर महिला आपली मैत्रीण असल्याचे सांगितले. दोघांची चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर भेट झाली होती. आरोपीने 11 ऑक्टोबर रोजी महिलेला दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर शुक्रवारी टिळक नगरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे हात-पाय साखळीने बांधून साखळीला कुलूप लावले होते. ज्या कारमधून आरोपींनी महिलेचा मृतदेह फेकून दिला होता, ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यासंबंधी अधिक तपास सुरू असून संशयित गुरुप्रीतची कसून चौकशी केली जात आहे.