वृत्तसंस्था / बेसील (स्वीस)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या स्वीस खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मोहीमेचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे राहिल. नुकत्याच झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांकडून साफ निराशा झाली. त्यामुळे आता स्वीस बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल.
स्वीस बॅडमिंटन स्पर्धा ही सुपर 300 दर्जाची असून 2022 साली सिंधूने या स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय, प्रियांशु राजवत, किरण जॉर्ज, किदांबी श्रीकांत, आयुष शेट्टी, सतीश करुणाकरन, टी. मनीपल्ली, शंकर सुब्रमनियन तर महिलांच्या विभागात पी. व्ही. सिंधू, मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय, आकर्षी काश्यप, रक्षिता रामराज, बारुआ, अनमोल खर्ब, तसनीम मीर तसेच महिला दुहेरीत त्रिशा जॉली, गायत्री गोपिचंद सहभागी होत आहेत. दुखापतीमुळे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविलेला नाही. पी. व्ही. सिंधूचा एकेरीतील सलामीचा सामना मालविका बनसोड बरोबर होत आहे.









