खराब पाण्यामुळे स्वीमिंगवर होती बंदी, प्रकल्पावर 1.54 अब्ज डॉलर्सचा खर्च
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील सीन नदीत आता लोकांना पोहण्याची अनुमती देण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 1923 मध्ये पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे स्वीमिंगवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 2025 मध्ये पूर्णपणे हटविली जाणार असल्याची माहिती पॅरिसच्या महापौर एनी हिडाल्गो यांनी दिली आहे. परंतु त्यापूर्वी देशात ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी जलतरणपटूंना पोहण्याची अनुमती मिळणार आहे. सीन नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पॅरिसमधील सीव्हेज सिस्टीमवर सुमारे 1.54 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
महापौरांनी सध्या केवळ 3 ठिकाणांना पोहण्यासाठी खुले करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित ठिकाणी सध्या काम सुरू असून ते पूर्ण होण्यास काही वेळ लागणार आहे. यातील एक ठिकाण हे आयफेल टॉवरच्या अत्यंत नजीक असल्भ्याचे सांगण्यात आले. सीन नदीचे पाणी आता अत्यंत साफ आहे. तसेच या पाण्याला अॅक्सिलेंट कॅटेगरी वॉटरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे लोकांना येथे पोहण्याचा आनंद घेता येणार आहे, त्यांच्या प्रकृतीला कुठलाच धोका नसल्याचे शहर प्रशासनाने म्हटले आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया
सीन नदीत पॅरिस शहरातील सांडपाणी मिसळत होते. हे सांडपाणी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी एक योजना आखण्यात आली आणि याकरता तज्ञांची मदत घेण्यात आली. शहराच्या सिव्हेज सिस्टीमला अत्यंत आधुनिक स्वरुप देण्यात आले. याकरता जलप्रक्रिया प्रकल्प निर्माण करत सुमारे 23 हजार अपार्टमेंट्सना या प्रकल्पांशी जोडण्यात आले जेणेकरून त्यांच्यातून निघणारे घाण पाणी नदीत मिसळू नये. या नदीत चालणाऱ्या हाउस बोट्समुळे समस्या उभी ठाकली होती. या हाउसबोट्सची संख्या 260 इतकी होती, त्यांच्यातून सांडपाणी नदीत मिसळले जात होते. यामुळे प्रशासनाने याकरता वेगळी योजना आखली. आता तेथे हाउसबोट्सचे संचालन होत असून त्यांच्यातील सांडपाणी नदीत मिसळत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान सीन नदीत काही सोहळ्यांचे आयोजन होणार आहे. 123 वर्षांनी पहिल्यांदाच या नदीत बहुराष्ट्रीय जलक्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहे.
प्रकल्पाचे काम अजून सुरूच
सीन नदीत पुन्हा लोकांना पोहण्याचा आनंद घेताना पाहणे हे आमचे स्वप्न होते. याकरता मोठी मेहनत करावी लागली, मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला, आता हे स्वप्न साकार होतेय. आम्ही सर्वांनी मिळून हे स्वप्न पूर्ण केल्याचे उद्गार महापौर एनी यांनी काढले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेला आता एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने उर्वरित गोष्टी लवकर पूर्ण केल्या जातील असे शहर प्रशासनाने म्हटले आहे.









