नवी दिल्ली:
फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी स्विगीने मार्च 2025 तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 1081 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा प्राप्त केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक वर्षाच्या आधी मार्च तिमाहीमध्ये कंपनीने 554 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला होता. या तिमाहीमध्ये कंपनीच्या तोट्यामध्ये वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. हा तोटा वाढण्याचे कारण क्विक कॉमर्स डिलिव्हरी व्यवसायामध्ये अर्थात इन्स्टामार्टमध्ये कंपनीकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याचदरम्यान जानेवारी मार्च दरम्यानच्या तिमाहीत कंपनीने महसुलाच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. स्विगीचा महसूल सदरच्या तिमाहीत वर्षाच्या आधारावर वाढत 4410 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षाच्या आधारावर महसूल 45 टक्के इतका अधिक वाढला आहे. स्विगी या कंपनीचे समभाग शुक्रवारी 0.57 टक्के इतक्या घसरणीसह 313 रुपयांच्या स्तरावर बंद झाले होते.









