वृत्तसंस्था/मॉन्ट्रीयल, टोरँटो (कॅनडा)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडची विम्बल्डन विजेती इगा स्वायटेकने तसेच कॅनडाच्या गॅब्रीयल डायलोने एकेरीची तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने चीनच्या ग्युओ हेनयुचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. विम्बल्डन स्पर्धेतील जेतेपदानंतर स्वायटेकचा हा पहिलाच सामना होता. दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीच्या इव्हा लीसने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. स्वायटेक आणि लीस यांच्यात तिसऱ्या फेरीतील सामना होणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणारी अमेरिकेची जेसीका पेगुलाने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना ग्रीसच्या मारिया सॅकेरीचा 7-5, 6-4, अमेरिकेच्या अॅनिसीमोव्हाने न्यूझीलंडच्या सनचा 6-4, 7-6 (7-5), अमेरिकेच्या मॅडिसन किजने जर्मनीच्या सिगमंडचा 6-2, 6-1 तसेच जपानच्या नाओमी ओसाकाने रशियाच्या सॅमसोनोव्हाचा 4-6, 7-6 (8-6), 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या डायलोने इटलीच्या मॅटो गिगानेटीचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. हा सामना 100 मिनिटे चालला होता.









