पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लाली
by इम्तियाज मुजावर
भिलार (ता. महाबळेश्वर) – पुस्तकांचं गाव आणि स्ट्रॉबेरीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार गावात यंदाच्या स्ट्रॉबेरी हंगामाची गोड आणि उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे. डीएसबी ग्रुप अँड कंपनीचे संस्थापक दिनेश भिलारे यांनी पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर जाहीर केला असून, या रेकॉर्डब्रेक दरामुळे भिलारमधील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे फुल उमटले आहेत.
सध्या स्ट्रॉबेरी हंगामाला दहा ते पंधरा दिवस सुरू होण्यासाठी वेळ असतानाही भिलार परिसरात फळांची पहिली तोडणी सुरू झाली आहे. आज या पहिल्या ट्रेचे पूजन डीएसबी ग्रुपचे मालक दिनेश भिलारे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर ही स्ट्रॉबेरी थेट मुंबई बाजारात रवाना करण्यात आली. पहिल्याच तोडणीला इतका उच्च दर मिळाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिलारमधील शेतकऱ्यांना मिळालेला ६०० रुपयांचा हा दर गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक दरांपैकी एक असून, त्यामुळे शेतकरी यंदा नव्या उमेदीनं आणि आत्मविश्वासानं उत्पादनाच्या कामाला लागले आहेत. डीएसबी ग्रुप अँड कंपनीची स्थापना सन २००७ मध्ये झाली असून, मागील १५ वर्षांपासून ही कंपनी सातत्याने शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे.
फक्त स्ट्रॉबेरीपुरतंच नव्हे, तर सफरचंद, पेरू, कीवी यांसारख्या फळांचंही खरेदी–विक्री व निर्यात या कंपनीमार्फत केली जाते. दिनेश भिलारे यांच्या पुढाकाराने ॲमेझॉन, ब्लिंकिट, सुगी, झोमॅटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून भिलारची स्ट्रॉबेरी उपलब्ध होते आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना घरबसल्या जागतिक बाजारपेठ मिळत आहे.
दिनेश भिलारे म्हणाले, “शेतकऱ्यांचा माल दर्जेदार असेल, तर त्याला योग्य दर मिळायलाच हवा. स्ट्रॉबेरीची गुणवत्ता वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या हातात अधिक उत्पन्न पोहोचवणे हेच आमचं ध्येय आहे.”
त्यांच्या या उपक्रमामुळे भिलारमधील शेतकऱ्यांना केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक बळही मिळत आहे. शेतकऱ्यांनी या दराचं स्वागत करत दिनेश भिलारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
सहाशे रुपयांच्या पहिल्या दरासह स्ट्रॉबेरी हंगामाची भिलारमध्ये गोड सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत या हंगामाला अधिक वेग येईल, असा विश्वास शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.








