स्वीडनकडून भारत सहाव्यांदा पराभूत
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
2024 च्या टेनिस हंगामातील डेव्हिस चषक विश्व गट एक मधील येथे सुरु असलेल्या लढतीत यजमान स्वीडनने सलामीचे दोन्ही एकेरीचे व त्यानंतर महत्त्वाचा दुहेरीचा सामना जिंकून भारतावर 3-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. डेव्हिज चषक स्पर्धेतील भारतीय संघाचा स्वीडनविरुद्ध हा सहावा पराभव आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत स्वीडन विरुद्धची भारताची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली आहे. या लढतीतील शनिवारी झालेल्या पहिल्या दोन्ही एकेरी सामन्यात स्वीडनने भारताचा पराभव करुन 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर रविवारी खेळविण्यात आलेल्या महत्त्वाच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात स्वीडनच्या आंद्रे गोरानसन आणि फिलिप बर्गेव्ही यांनी भारताच्या रामकुमार रामनाथन आणि एन. श्रीराम बालाजी यांचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत भारताचे या लढतीतील आव्हान संपुष्टात आणले. हा दुहेरीचा सामना 80 मिनिटे चालला होता. आता परतीचे एकेरी सामने केवळ औपचारिकता म्हणून राहतील. या पराभवामुळे भारतीय डेव्हिस संघाला पुढील वर्षी या स्पर्धेत प्लेऑफ गटात खेळावे लागेल. पुरुष दुहेरीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीला केवळ 3 गेम्स जिंकता आले, पण बालाजीला आपली सर्व्हिस राखता आली नाही. रामकुमार रामनाथनने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसऱ्या सेटमध्ये स्वीडनच्या जोडीला एकतर्फी विजय मिळू दिला नाही. या दुसऱ्या सेटमध्ये भारताने 4 गेम्स जिंकले.