महिलांची विश्वकरंडक फुटबॉल : जपान, नेदरलँड्स यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ ऑकलंड, वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या 2023 सालातील फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्वीडन आणि स्पेन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीडनने जपानचा तर स्पेनने नेदरलँड्सचा पराभव केला. आता स्वीडन आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.
शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडवले पण स्वीडनच्या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत जपानचे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले. स्वीडनने जपानचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. स्वीडनतर्फे अमांदा इलेस्टेडने तर फिलिपा अँजेलडेल यांनी प्रत्येकी एक गोल केला. इलेस्टेडचा या स्पर्धेतील हा चौथा गोल ठरला तर अँजेलडेलने स्वीडनचा निर्णायक गोल पेनल्टीवर नोंदवला. इडन पार्क मैदानावर सुमारे 30 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर बचावफळीत खेळणाऱ्या इलेस्टेडने स्वीडनचे खाते उघडले. या स्पर्धेत पहिल्यांदाच जपानला आतापर्यंत झालेल्या सामन्यात पिछाडीवर राहावे लागले. मध्यंतरापर्यंत स्वीडनने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर स्वीडनला पेनल्टीची संधी मिळाली आणि अँजेलडेलने कोणतीही चूक न करताना आपल्या संघाचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास 10 मिनिटे असताना जपानने आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देत स्वीडनच्या बचावफळीवर दडपण आणण्यात यश मिळवले. या कालावधीत जपानला पेनल्टीची संधी मिळाली पण त्यांच्या रिको युकीला या संधीचा फायदा उठवता आला नाही. स्वीडनच्या महिला संघाने तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत माजी विजेत्या अमेरिका, जर्मनी आणि नॉर्वे यांचे आव्हान लवकरच संपुष्टात आले. आता यांच्यामध्ये जपानचा समावेश झाला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना सिडनीमध्ये पुढील आठवड्यात होणार आहे. मात्र फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यावेळी नवा विजेता पहावयास मिळेल. 2003 साली या स्पर्धेत स्वीडनने उपविजेतेपद मिळवले होते. आता स्वीडनचा उपांत्य फेरीचा सामना ऑकलंडमध्ये स्पेनबरोबर येत्या मंगळवारी होणार आहे. 2011 साली जपानने या स्पर्धेत शानदार कामगिरी करून विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान दोन वर्षापूर्वी झालेल्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेत जपान संघाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीडनकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेमध्ये स्वीडनची इलेस्टेड ही गोल्डन बूटची प्रमुख दावेदार म्हणून ओळखली जाते. मात्र जपानच्या मियाझेवाने या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे आतापर्यंत 5 गोल नोंदवले आहेत. जपानचे आव्हान संपुष्टात आल्याने इलेस्टेडला सर्वाधिक गोल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सामन्यात 76 व्या मिनिटाला जपानला पेनल्टीची संधी मिळाली पण त्यांच्या संघातील बदली खेळाडू युकीला गोल नोंदवता आला नाही. 87 व्या मिनिटाला स्वीडनला आघाडी घेण्याची संधी लाभली होती पण फुजिनोचा फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळल्याने त्यांना तिसरा गोल नोंदवता आला नाही. सामना संपण्यास केवळ काही सेकंद बाकी असताना किको सेकी आणि हेयाशी यांच्या प्रयत्नामुळे जपानला शेवटच्या क्षणी आपले खाते उघडता आले.

स्पेन उपांत्य फेरीत
या स्पर्धेतील वेलिंग्टनमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सलमा पॅरालुलोने जादा कालावधीत नोंदवलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर स्पेनने नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सामन्यातील 81 व्या मिनिटाला मारिओना कॅलेडेंटीने पेनल्टी कॉर्नरवर स्पेनचा पहिला गोल केला होता. त्यानंतर स्टिफेनी व्हॅन डेर ग्रेगेटने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी जादा कालावधीचा अवलंब केला. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पेनल्टीवर जाईल असे वाटत असतानाच 19 वर्षीय पॅरालुलोने अप्रतिम निर्णायक गोल नोंदवून नेदरलँड्सचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. चार वर्षापूर्वी नेदरलँड्स संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते पण यावेळी त्यांना उपांत्य फेरी पूर्वीच हार पत्करावी लागली. या संपूर्ण सामन्यात स्पेनने आपले वर्चस्व शेवटपर्यंत राखले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटामध्ये झालेल्या सामन्यात स्पेनला जपानकडून 0-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात नेदरलँड्सच्या खेळाडू पेनल्टीवर गोल नोंदवण्यास अपयशी ठरले. 81 व्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी किकची संधी मिळाली आणि त्यांच्या कॅलेडेंटीचा फटका नेदरलँड्सच्या गोलरक्षकाला थोपवता आला नाही. स्पेनला ही आघाडी फारवेळ राखता आली नाही. निर्धारित कालावधी संपण्यापूर्वीच स्टिफेनी व्हॅन डेर ग्रेगेटने नेदरलँड्सचा गोल केल्याने दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. पंचांनी जादा कालावधी दिल्यानंतर पॅरालुलोचा गोल स्पेनला निर्णायक ठरल्याने नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात स्पेन संघाला हर्नांडेझची उणीव चांगलीच भासली. गेल्या सामन्यात तिला पिवळे दाखवण्यात आल्याने ती या सामन्यात खेळू शकली नाही.









