वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते पदाची शपथ देण्यात आली आहे. न्या. सतीशचंद्र शर्मा, न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्या. संदीप मेहता अशी त्यांची नावे आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका समारंभात हा शपथविधी कार्यक्रम गुरुवारी पार पडला. हे तिन्ही न्यायाधीश अनुक्रमे दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी येथील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड केली होती. केंद्र सरकारने संमती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता शपथविधीनंतर ते त्यांच्या पदांचा कार्यभार सांभाळण्यास सज्ज झाले असल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीची आणि शपथविधीची माहिती ‘एक्स’ वर प्रसारित केली. त्यांच्या नावांची सूचना 6 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली होती. त्यानंतर त्वरित केंद्र सरकारने या नावांना संमती दिल्यानंतर शपथविधी कार्यक्रम करण्यात आला.









