इतर देशांच्या शिष्टमंडळांनाही भेटणार : 20 जानेवारीला भव्य-दिव्य स्वरुपात शपथसोहळा : चीनच्या राष्ट्राध्यक्षांनाही आमंत्रण
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला ते भारतातर्फे उपस्थित राहणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने भारताला निमंत्रण पाठवले आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. अमेरिकेत पोहोचल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ट्रम्प प्रशासनात सामील होणाऱ्या मंत्र्यांना आणि इतर विविध देशांच्या नेत्यांनाही भेटतील.
20 जानेवारीला होणाऱ्या भव्य-दिव्य समारंभात डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या समारंभासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच विविध देशांचे प्रमुख आणि महनीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतासोबतच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले आणि एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या प्रवक्त्या कॅरोल लेविट यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केल्याची पुष्टी केली आहे. ‘ट्रम्प सर्व देशांच्या नेत्यांशी मोकळेपणाने बोलू इच्छितात, मग ते आमचे मित्र असोत किंवा आमचे विरोधक असोत’, असे लेविट यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील अब्जाधीशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. तथापि, कार्यक्रमासाठी मोठी देणगी देऊनही, सर्व व्हीआयपी तिकिटे विकली गेली असल्याने अनेक लोकांना प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या आयोजन पथकाने आतापर्यंत या कार्यक्रमासाठी 1,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. लवकरच हा आकडा 1,700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे मानले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना 312 इलेक्टोरल मते मिळाली, तर कमला हॅरिस यांना फक्त 226 मते मिळाली. अमेरिकेत निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते.
शपथविधी कसा होईल?
डोनाल्ड ट्रम्प सोमवार, 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे शपथ घेतील. यादरम्यान, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देतील. 21 व्या शतकात पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुट्टीच्या दिवशी पदाची शपथ घेतील. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन संसदेचे संयुक्त अधिवेशन होईल. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कॅपिटल हिलभोवती कुंपण घालण्यात आले असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.









