अझारेन्का, साबालेन्का, कॉलिन्स, क्विटोव्हा, सिलिक, रुबलेव्हही चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
महिलांमधील जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. त्याचप्रमाणे कार्लोस अल्कारेज, राफेल नदाल, मारिन सिलिक, फ्रान्सेस टायफो, कॅमेरॉन नूरी, आंद्रे रुबलेव्ह, पेत्र क्विटोव्हा, आर्यना साबालेन्का, डॅनियली कॉलिन्स, क्लारा ब्युरेल, व्हिक्टोरिया अझारेन्का, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीही चौथी फेरी गाठली. रिचर्ड गॅस्केट, गार्बिन मुगुरुझा, पेत्र मार्टिक, बेलिंडा बेन्सिक, ऍलिस कार्नेट, डॅन इव्हान्स, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांचे आव्हान संपुष्टात आले.

इगा स्वायटेकने सलग दुसऱया वर्षी या स्पर्धेची चौथी फेरी गाठताना बिगरमानांकित लॉरेन डेव्हिसचा 6-3, 6-4 असा पराभव केला. स्वायटेक दुसऱया सेटमध्ये 1-4 अशी पिछाडीवर पडली असताना सलग पाच गेम्स जिंकून तिने विजय खेचून आणला. 21 वर्षीय स्वायटेकची पुढील लढत जर्मनीच्या ज्युल नीमियरशी होईल. झेकच्या पेत्र क्विटोव्हाने नवव्या मानांकित स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचे आव्हान 5-7, 6-3, 7-6 (12-10) असे संपुष्टात आणत आगेकूच केली. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाशी तिची पुढील लढत होईल. क्विटोव्हा व मुगुरुझा यांच्यात आतापर्यंत सातवेळा गाठ पडली असून सहाव्यांदा क्विटोव्हाने तिच्यावर विजय मिळविला आहे. या स्पर्धेत आता महिलांमध्ये टॉप टेनमधील चार महिला बाकी राहिल्या आहेत.
अझारेन्का, प्लिस्कोव्हा, साबालेन्का विजयी

सहाव्या मानांकित आर्यना साबालेन्काने पुढील फेरी गाठताना फ्रान्सच्या पात्रता फेरीतून आलेल्या क्लारा ब्युरेलचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडविला. आठव्या मानांकित पेगुलाने चीनच्या पात्रता फेरीतून आलेल्या युआन युइवर 6-2, 6-7 (6-8), 6-0 अशी मात केली तर तीन वेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविणाऱया क्हिक्टोरिया अझारेन्काने पेत्र मार्टिकचा 6-3, 6-0 असा फडशा पाडला. तिची पुढील लढत कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी होईल. प्लिस्कोव्हाने ऑलिम्पिक चॅम्पियन बेलिंडा बेन्सिकला 5)7, 6-4, 6-3 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले.
अमेरिकेच्या डॅनियली कॉलिन्सनेही आगेकूच केली असून तिने फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटवर 6-4, 7-6 (11-9) अशी मात केली. कॉलिन्सने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद मिळविले होते. कॉलिन्सने पहिल्या फेरीत नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का दिला होता.
अल्कारेज, सिलिक विजयी
पुरुष एकेरीत 19 वर्षीय तिसऱया मानांकित कार्लोस अल्कारेजने अमेरिकेच्या जेन्सन बूक्सबीचा 6-3, 6-3, 6-3 असा सहज पराभव केला. मागील वर्षी अल्कारेजने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 2014 चा चॅम्पियन मारिन सिलिकने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सवर चार सेट्सच्या झुंजीत मात करताना 7-6 (13-11), 6-7 (3-7), 6-2, 7-5 असा विजय मिळविला. या लढतीत त्याने 26 बिनतोड सर्व्हिस केल्या. फ्रान्सेस टायफोने सलग तिसऱयांदा या स्पर्धेची चौथी फेरी गाठताना अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा 7-6 (9-7), 6-4, 6-4 असा पराभव केला.
नदाल, रुबलेव्ह, यांची आगेकूच

ब्रिटनच्या सातव्या मानांकित नूरीने चौथी फेरी गाठली असून त्याने डेन्मार्कच्या होल्गर रुनेवर 7-5, 6-4, 6-1 अशी मात केली. नूरीची पुढील लढत रशियाच्या नवव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हशी होणार आहे. रुबलेव्हने कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हवर पाचव्या मॅचपॉईंटवर 6-4, 2-6, 6-7 (3-7). 6-4, 7-6 (10-7) असा विजय मिळविला. माजी अग्रमानांति राफेल नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचा 6-0, 6-1, 7-5 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. दोन तास 17 मिनिटे ही लढत रंगली होती. अमेरिकेच्या 22 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोविरुद्ध त्याची पुढील लढत होईल









