निपाणी एफसी संघाला पुढे चाल, बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त, बेळगाव फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून स्वस्तिक संघाने इलेव्हन स्टार संघाचा 6-0 तर मोहब्ल्यू संघ न आल्यामुळे निपाणी फुटबॉल क्लबला पुढे चाल देण्यात आली. लव्हडेल स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात स्वस्तिक संघाने इलेव्हन स्टार संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला उबादा किल्लेदारच्या पासवर उझैर जमादारने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 16 व्या मिनिटाला उझैर जमादारच्या पासवर जहीदने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. पहिले सत्र संपण्यास केवळ एक मिनिट बाकी असताना खिजार जमादारच्या पासवर उझैर जमादारने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला जहीदच्या पासवर उबादा किल्लेदारने चौथा गोल केला. 40 व्या मिनिटाला उझैर जमादारच्या पासवर खिजार जमादारने पाचवा गोल केला. तर 49 व्या मिनिटाला उबादा किल्लेदारच्या पासवर जहीदने सहावा गोल करुन 6-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात नवख्या इलेव्हन स्टार संघाने गोल करण्याच्या संधी वाया दवडल्या. दुसऱ्या सामन्यात मोहब्ल्यू स्पोर्ट्स क्लब न आल्यामुळे निपाणी फुटबॉल क्लबला पुढे चाल देण्यात आली. पहिल्या फेरीत इलेव्हन स्टार, टीएफए, टिळकवाडी इलेव्हन एफसी, वायएमसीए, निपाणी एफसी, स्वस्तिक एफसी, युनायटेड गोवन्स हे आठ संघ पात्र ठरले आहेत. पुढील फेरीसाठी अजून संघ पात्र होणार असून त्यानंतर सुपर लीग सामने खेळविण्यात येणार आहेत.
कारवाई टाळण्यासाठी संघांना भाग घेण्याचे आवाहन
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगावमध्ये सुरू असलेल्या बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धेत काही संघांनी भाग घेतला नाही. सदर स्पर्धेचे नामांकन सीआरएसतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व इंडियन फुटबॉल संघटनेच्या नियमानुसार जर संघ न खेळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. असे न होता संघांनी व खेळाडूंनी पुढील फेरीत आपले सामने स्पर्धेत उतरुन खेळावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष यांनी केले आहे.









