गायिका उर्मिला धनगर यांच्या गायनाने मने जिंकली : मर्कंटाईल सोसायटी व मर्कंटाईल सेवा संघातर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
गुलाबी थंडीमध्ये पहाडी आवाजाचा अनुभव बेळगावच्या श्रोत्यांना बुधवारी स्वरसंध्या कार्यक्रमात घेता आला. पहाडी आवाजाची देणगी लाभलेल्या गायिका उर्मिला धनगर यांनी एकाहून एक सरस लोकगीते, चित्रपट गीते मालिकांचे टायटल साँग सादर करून बेळगावकरांची मने जिंकली. ‘मला जाऊ दे’ या गाण्याने तर उपस्थितांना थिरकायला लावले.
मर्कंटाईल सोसायटी व मर्कंटाईल सेवा संघातर्फे आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमात मराठीतील आघाडीची गायिका उर्मिला धनगर हिने अप्रतिम गाणी सादर केली. अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मराठी गाण्यांचा नजराणा सादर केला. प्रारंभी मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे व गायिका उर्मिला धनगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
रसिकांनी दिली टाळ्यांची दाद
बेळगावचे रसिक दर्दी म्हणून ओळखले जातात. उर्मिला धनगर यांनी विविध पठडीतील गीते सादर केली. ‘आई भवानी तुझे लेकरू’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उर्मिला धनगर यांचे मराठी चित्रपट क्षेत्रात ज्या गाण्याने पदार्पण झाले त्या ‘आंबा पिकतो रस गळतो’ या गाण्याला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. त्यानंतर ‘रुपेरी वाळूत’, ‘अश्विनी ये ना’, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेचे टायटल साँग, ‘लेक वाचली वाढली’, ‘मेरे सपनों की रानी’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’, ‘मला जाऊ दे’ अशी एकाहून एक सुपरहिट गाणी सादर केली.
त्यांना त्याच तोलामोलाच्या कलाकारांची साथ लाभली. मराठीतील पार्श्वगायिका स्नेहा दांडेकर यांनी कोरस साथ दिली. त्याचबरोबर आदित्य कावळे, अनिकेत गंगावणे, विनायक चेऊलकर, राजेश हेरंब यांनी संगीत साथ दिली. पराग चौधरी यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले.









