प्रतिनिधी / आमोणे
आमोणे स्वरदीपने अवघ्या सात, आठ वर्षाच्या कालावधीत संपूर्ण गोवाभर विविध संगीताचे कार्यक्रम करुन बरीच बक्षीसे प्रात केली ही कौतुकाची बाब आहे. तेथे संगीताचे धडे घेणारे विद्यार्थी भविष्यात लौकीक प्राप्त करतील, असे प्रतिपादन गोवा भाजप महिला प्रमुख सुलक्षणा सावंत यांनी केले.
स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणे या संस्थेतर्फे येथील श्री गणपती मंदिरात आयोजित ‘संगीत प्रदर्शन’ या कार्यक्रमात त्या प्रमुख वत्त्या म्हणून बोलत होत्या. या वेळी त्याच्या समवेत व्यासपीठावर स्थानिक सरपंच कृष्णा गावस, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, उपसरपंच सुमित्रा सावंत, पंच वसंत सिनारी, अनिशा आमोणकर, गौरवी गावस, सागर फडते, सम्राट अमरावती क्लबचे अध्यक्ष सचिन आपटे, स्वरदिपचे अध्यक्ष महेश सावंत व श्री महागणपती मंदीराचे व्यवस्थापक आनंद नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रांरभी सर्व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन झाले, नंतर महेश सावंत यानी प्रास्तविक केले. यावेळी सावंतवाडा येथील अंगणवाडी शिक्षिका चित्रा फोंडेकर यांचा चांगल्या कार्याबद्दल प्रमुख वत्त्या सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्वरदीप संस्थेत संगीताचे धडे देणारे शिक्षक दिनकर घाडी यांचे कार्य कौतुक करण्यासारखे आहे. त्यांची प्रत्येक कार्यक्रमावेळी धडाडी पाहाता यापुढे संस्थेला चांगला लौकीक लाभेल असे कृष्णा गावस म्हणाले. गोपाळ सुर्लकर यांनी स्वरदीपला शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी स्वरदीपच्या विद्यार्थ्यांनी गायन, भजन, नाटय़गीत, भावगीत, भक्तीगीत, अभंग, हार्मोनियम, तबला आदी कला सादर करुन रसिकांकडून वाहावा मिळविली. कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन दिशा घाडी यांनी केले तर तन्वी सावंत यांनी आभार मानले.









