वार्ताहर /सावईवेरे
संगीताच्या माध्यमातून भगवंताची भक्ती निश्चितपणे दुप्पट होत माणसाच्या जीवनात एक प्रकारची गती प्राप्त होत असते. त्यामुळे आजच्या युवा पिढीने इतर निरर्थक व्यसनाकडे न वळता संगीताचे व्यसन व ध्यास घेतला पाहिजे. वळवई व सावईवेरे ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक दिग्गज संगीत कलाकार निर्माण झाले. या दोन्ही गावातील कलाकारांनी राज्याचे व देशाचे नाव उज्वल केल्याने मला या दोन्ही गावाचा फार मोठा अभिमान वाटतो असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. वळवईचे बहुआयामी कलाकार कै. रमाकांत नाईक स्मृती प्रित्यर्थ श्री खामिणी सांस्कृतिक मंडळ व मनिषा स्मृती प्रतिष्ठान, सार्वईवेरे यांच्यातर्फे आयोजित ‘स्वरांजली’ संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सातेरीभाट-वळवई येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर सत्कारमूर्ती पं. तुळशीदास नावेलकर, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, पंचसदस्य निळकंठ नाईक, शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष अंकुश नाईक, स्वागताध्यक्ष संदीप निगळ्यो, संदेश खेडेकर व महेश शिलकर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की कै. रमाकांत नाईक यांनी संगीत क्षेत्रात फार मोठे योगदान देत अनेक कलाकार त्यांनी घडविले. पं. तुळशीदास नावेलकर यांनी तबला वादनासाठी अथक परिश्रम घेत गोव्याचे एक दिग्गज तबलापटू म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. गोव्याच्या मातीतच लय आणि ताल भरलेला असल्याने संगीत क्षेत्रात आपला गोवा माहिर आहे. त्यासाठी केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही अशाप्रकारची संगीत संमेलने भरवून संगीताची आराधना केली पाहिजे तरच भावी पिढीला ही संमेलने मार्गदर्शक ठरतील व संगीताचे जे कार्य आहे ते निश्चितपणे ते पुढे नेतील. केंद्र व राज्य सरकारतर्फेसुद्धा या क्षेत्रात उत्तम सहकार्य मिळत आहे.
यावेळी बोलताना विनायक वेंगुर्लेकर म्हणाले की वळवई व सावईवेरे ही कलाकारांची खाण असून या भूमीत अनेक दिग्गज कलाकार निर्माण झाले. वळवईचे नामवंत कलाकार कै. रमाकांत नाईक यांच्या स्मृती जागविल्याबद्दल त्यांनी आयोजन समितीचे कौतूक केले. सर्वप्रथम प्रणाम फाऊंडेशनच्या कत्थक नृत्यांगना रेखा मडकईकर आणि त्यांच्या शिष्य परिवारातर्फे नृत्याविष्काराने संमेलनाची बहारदार सुरुवात झाली. संदीप निगळ्यो यांनी स्वागतपर विचार मांडले. श्रीपाद नाईक व सर्व मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. रमाकांत नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्रीपाद नाईक यांच्याहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. गोव्याचे आघाडीचे नामवंत तबलापटू पं. तुळशीदास नावेलकर यांचा श्रीपाद नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. समीर नाईक यांनी मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी तुळशीदास नावेलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रनिवेदन गोविंद भगत यांनी केले तर महेश शिलकर यांनी आभार मानले.









