ओटवणे | प्रतिनिधी
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी ओटवणे येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा स्वप्निल आपा म्हापसेकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय ल गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी प्रमोद टक्के यांनी ही निवड केली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या कार्यकारणी बैठकीत पाच वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.सुमधुर आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेले बुवा स्वप्निल म्हापसेकर गेली २० वर्षे भजन क्षेत्रात विद्यार्थीदशेपासूनच भजन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी भजन कलेची जोपासना करतानाच भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत भजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक भजन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादक पारितोषिके पटकाविली आहेत. डबलबारी क्षेत्रातही स्वप्निल म्हापसेकर यांनी गेल्या काही वर्षात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. भजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. स्वप्निल म्हापसेकर यांनी सुरुवातीला भजन कला गुरुवर्य संगीत विशारद बुवा कृष्णा राऊळ त्यांच्याकडून आत्मसात केली. त्यानंतर डबलबारीमध्ये त्यांना गुरुवर्य बुवा गुंडू सावंत तसेच बुवा प्रवीण सुतार आणि गुरुवर्य पखवाज विशारद माऊली आनंद मोर्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी स्वप्निल म्हापसेकर यानी आपल्या या जडणघडणीत गुरुंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच तमाम संगीत व भजन तसेच डबलबारी रसिकांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला
Previous Articleखंडणीखोर महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
Next Article सातारा-लोणंद महामार्गाचे होणार दुहेरीकरण









