राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड : मिश्र दुहेरीत राही-प्रवीण जोडीला कांस्य : तिरंदाजीत महाराष्ट्राचा दुहेरी सुवर्णवेध
वृत्तसंस्था/डेहराडून
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. याचबरोबर राही सरनोबत व प्रवीण पाटील या जोडीने मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले. त्रिशूल शूटिंग रेंजवर गुरुवारी (दि. 6) संपलेल्या नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची दोन कांस्यपदकाने सांगता झाली. ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेने सुरुवातीच्या संघर्षानंतर स्वत:ला सावरत पुरुषांच्या 50 मिटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 447.7 गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली.
सेनादलाच्या नीरज कुमारने एकूण 464.1 गुणांसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर मध्य प्रदेशचा प्रताप सिंग तोमर 562.4 गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्वप्नीलची सुरुवात समाधानकारक झाली नाही. थ्री पोझिशनच्या नीलिंग (गुडघ्यावर बसून) प्रकारात स्वप्नीलची दहाव्या शॉटपर्यंत अखेरच्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर प्रोन प्रकारातही 25 व्या शॉटपर्यंत तो अखेरच्याच स्थानावर होता. त्यानंतर त्याने कामगिरीत सुधारणा करीत 30 व्या शॉटपर्यंत दोन स्थानाने प्रगती करीत सहावे स्थान गाठले, तर 35 व्या शॉटपर्यंत थेट तिसऱ्या स्थानी मुसंडी मारताच महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या. इलिमिनेशनचा थरार सुरू झाल्यानंतर स्वप्नीलने अचूक वेध घेत किमान कांस्यपदक, तरी हातातून निसटणार नाही, याची काळजी घेतली.
तरीही स्वप्नीलच ठरला मुख्य आकर्षण!
ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी तोच त्रिशूल नेमबाजी रेंजवरील मुख्य आकर्षण ठरला. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. उत्तराखंडच्या दोन-तीन मंत्र्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश होता.
राही-प्रवीणची एकतर्फी बाजी
राही सरनोबत आणि प्रवीण पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने 10 मिटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत यजमान उत्तराखंडच्या जोडीचा 17-3 असा धुव्वा उडवून कांस्यपदक जिंकले. 10 फेऱ्यांचा या लढतीत राही-प्रवीण या जोडीने सहज बाजी मारली. नवख्या उत्तराखंडच्या जोडीचा पराभव झाला असला, तरी त्यांनी इथपर्यंत मजल मारून उपस्थितांची मने जिंकली.
प्रज्वल देव अंतिम फेरीत
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसपटू प्रज्वल देवने पुरुष एकेरीतील उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. देवच्या या कामगिरीमुळे कर्नाटकाला आणखी एक सुवर्णपदक मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रज्वल देवने आपले एकेरीचे आणि दुहेरीचे सामने जिंकून कर्नाटकाला अंतिम फेरीत नेले आहे. कर्नाटक विद्यमान विजेता आहे. आता सुवर्णपदकासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात शुक्रवारी सामना होणार आहे. तामिळनाडूने उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा 2-1 असा पराभव केला. सेनादल आणि कर्नाटक यांच्यातील उपांत्य लढतीत सेनादलाच्या ऋषभ अगरवालने कर्नाटकाच्या निकी पुनाच्याचा 6-4, 1-6, 6-1 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरीत सामन्यात कर्नाटकाच्या प्रज्वल देवने सेनादलाच्या इक्बालचा 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात प्रज्वल आणि निकी यांनी सेनादलाच्या अगरवाल व फैजल कमार यांचा 6-3, 6-4 अशा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या विभागात कर्नाटकाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. तामिळनाडूने कर्नाटकावर 2-1 अशी मात करत उपांत्यफेरी गाठली.
वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना नमवित महाराष्ट्राचा दुहेरी सुवर्णवेध!
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिंपियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्णभेद साधला. याचबरोबर गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरयाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत 4-4 अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफमध्ये गेली. शूट ऑफमध्ये विजय प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकाविले. हरयाणाच्या जोडीने 9-9 असा वेध घेतला. मग गाथानेही 9 गुणांचाच वेध घेतल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती. मात्र, बाबरेकरने मोक्याच्या वेळी 10 गुणांचा वेध घेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे व मुक्ता मोडगी यांनी सांघिक महिला गटातून झारखंडच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत व कोमालिका बारी या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाचा 6-1 फरकाने पराभव करून महाराष्ट्राच्या झोळीत सुवर्णपदक टाकले.









