वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
रत्नागिरी: प्रतिनिधी
माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांच्या डीएनए अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे डीएनए अहवालात स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हा खून झाल्याचे जाहीर केले होते.
स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती सुकांत गजानन सावंत यांनी २ सप्टेंबर २०२२ ला दिली होती. सावंत पती – पत्नीमध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. याबाबत पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारीदेखील दाखल आहेत. स्वप्नील सावंत हिच्याबद्दल यापूर्वीही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या.
पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी यांनी ११ सप्टेंबरला दिली. त्यामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत, रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद रावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सांवत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला दिशा दिली. तत्कालीन अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी नेतृत्वाखाली ७ तपासपथके तयार करण्यात आली. गुन्ह्यातील ठोस पुरावे शोधून काढण्याबाबत वेगवेगळी उद्दिष्टे त्यांना देण्यात आली. 3 दिवस पोलिसांनी अहोरात्र या प्रकरणाचा तपास सुरू केला. संशयित आरोपी सुकांत सावंत वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते.
सुकांत सावंत तसेच त्याचे साथीदार रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद रावणंग यांनी पूर्वनियोजनाने व शांतपणे १ स्प्टेंबरला २०२२ स्वप्नाली सावंत हिचा मिऱ्याबंदर येथील घरी दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेंढ्यामध्ये झाकून लपवून ठेवला होता. अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घराच्या आवारातच पेंढा आणि पेट्रोलने जाळून टाकला. जाळल्यानंतर उरलेली राख २० बॅगांमध्ये भरून ती समुद्रात टाकून दिल्याचे तसेच ज्या ठिकाणी तिचा मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई केल्याचे उघड झाले. गडबडीत त्यातील काही हाडे आणि मांस, दात तिथेच पडले होते. आरोपींची ही चूक महागात पटली आणि खुनाचा कट उघड झाला. याचा तांत्रिक व पारंपरिक पद्धतीने तपास सुरू आहे. मुलीच्या डीएनएबरोबर हा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी पाठवलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए मॅच झाल्याचे पोलिसदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.









