प्रतिनिधी /पणजी
दहा टक्के लोकांच्या क्रियाशीलतेमुळे कोणतीही क्रांती घडते व त्याचा लाभ शंभर टक्के लोकांना होतो. असे क्रांतिकारक स्वामी विवेकानंद होते. त्यांच्या विचारातून देशाला गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल याचा विचार आपण केला पाहिजे असे सांगून, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी संपूर्ण गोव्यातील तरुणांमध्ये नवचैतन्य जगविण्याचा मानस व्यक्त केला.
स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या गोवा शाखेतर्फे पाटो-पणजी येथील संस्कृती भवन मधील सभागृहात झालेल्या विश्व बंधुत्व दिन कार्यक्रमात रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विशेष पाहुणे गोवा राज्य जैव विविधता बोर्डाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सारमोकादम,प्रमुख वक्ते पत्रकार परेश प्रभू, विवेकानंद केंद्र गोवा शाखेचे संयोजक वल्लभ केळकर व सहसंयोजक प्रशांत वेळीप उपस्थित होते.
डॉ. मोकादम म्हणाले, निसर्गनियम व मानवताधर्म सर्व जगाने पाळावा असे विवेकानंदाना वाटत होते. सर्व संस्कृतींना सामावून घेईल अशी भारतीय संस्कृतीची थोरवी आहे आणि आणि आपला हिंदू धर्म सर्व धर्मांचा परिपोषक आहे हे विवेकानंदांनी पटवून दिले.त्यांच्या विचारांचे सार घेऊन आपण पुढे गेले पाहिजे.
परेश प्रभू यांनी सांगितले की, ज्या काळात विवेकानंदानी शिकागो मध्ये आपल्या धर्माविषयी विचार मांडले त्यावेळी देशावर ब्रिटिशांचे राज्य होते.आपला धर्म, संस्कृती कालबाह्य झाली आहे अशी तरुणांची भावना झाली होती,अशावेळी त्यांच्या विचारांवरील जळमटे विवेकानंदांनी दूर केली.धर्म, पंथ यापलिकडे आपल्या मानवता धर्माची ओळख त्यांनी तेथील भाषणातून करून दिली. धर्माच्या गाभ्याशी नेण्याचा त्यांनी भाषणातून प्रयत्न केला. माणसातील आत्मतत्वावर त्यांचा विश्वास होता. देशातील पूर्ण समस्यांचा विचार त्यांनी, शिकागोला जाण्यापूर्वी भारताची परिक्रमा करून केला होता. स्त्रियांच्या उद्धाराचा विचार त्यांनी केला होता.
सामान्य जनतेची उपेक्षा होत असेल तर ते मोठे पाप आहे असे त्यांना वाटे असे स्पष्ट करून परेश प्रभू म्हणाले, वेगवेगळय़ा धर्मांच्या अभ्यासातून त्यांची दृष्टी व्यापक बनली होती. वेगवेगळय़ा विषयांचे ज्ञान त्यांना होते. ईश्वर सन्मुख धर्म त्यांनी मनुष्य सन्मुख केला. प्रत्येक क्षेत्रात चारित्र्यवान माणसे नसावीत हे देशाच्या सगळय़ा समस्यांचे मूळ आहे हे त्यांनी हेरले होते.भारताच्या पुनुरुत्थानाचे स्वप्न त्यांनी बघितले होते. आयुष्याच्या पूर्णत्वासाठी विवरकानंदांचे विचार अभ्यासून तरुणांनी आपले व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन प्रभू यांनी शेवटी केले.
वल्लभ केळकर यांनी प्रास्ताविक केले. अमेय किंजवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेच्या स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याचे निवेदन तेजस्विनी जेलू गडेकर हिने केले. अमेय किंजवडेकर याने सूत्रसंचालन केले. प्रतिभा यांनी आभार मानले.
सैद्धांतिक नेतृत्वाची आज गरज
माझ्या राजकीय आयुष्यात एकही पैशाची जमीन खरेदी केली नाही की बायकोच्या अंगावर दागिना घातला नाही .माझ्याकडे कामासाठी येणारा एकही माणूस निराश होऊन परत जाणार नाही हे कटाक्षाने पाहिले. निवडणूकित तरुणांना दारूची आमिषे दाखवली जातात परंतु मी त्याला फाटा दिला. सैद्धांतिक नेतृत्वाची आज गरज आहे.









