न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लैंगिक छळाच्या आरोपांनंतर दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्चचे (‘एसआरआयएसआयआयएम’) माजी व्यवस्थापक स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यारात्री उशिरा ताजगंज येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. ते दिल्लीतील ‘एसआरआयएसआयआयएम’मधील लैंगिक छळासंबंधीच्या आरोपांमुळे सध्या चर्चेत आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी काही विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळी ते संस्थेचे व्यवस्थापक होते. त्यांना पार्थ सारथी म्हणूनही ओळखले जाते.
स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांना 27 सप्टेंबरच्या रात्री दिल्ली पोलिसांनी आग्रा येथे अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणले. त्यानंतर त्यांना पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली. पोलिसांची ही मागणी मान्य करत पाच दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे.
लैंगिक छळाचे आरोप झाल्यापासून चैतन्यानंद फरार होते. पोलिसांकडून त्यांचा कसून तपास सुरू असतानाच त्यांचे शेवटचे ठिकाण आग्रा येथे सापडले. दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी छापे टाकत अखेर त्यांचा अचूक ठावठिकाणा शोधून काढला. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड जप्त केली आहेत. एका कार्डवर त्यांची संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरूपी राजदूत म्हणून ओळख दाखविण्यात आली आहे. तर दुसऱ्या कार्डवर त्यांची ब्रिक्स संयुक्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे विशेष दूत म्हणून उल्लेख आहे.
अटक करण्यात आलेल्या आग्रा येथील हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट भरत यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चैतन्यानंद शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या वास्तव्यादरम्यान कोणीही त्यांना भेटायला आले नाही. रात्रीच्या शिफ्टमधील कर्मचारी ड्युटीवर असताना पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास दिल्ली गुन्हे शाखेचे निरीक्षक असल्याचे सांगून दोन पोलीस तेथे आले. सदर पोलिसांनी चैतन्यानंद यांच्या खोलीत जवळपास 10 मिनिटे विचारपूस करून लगेचच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हा
स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. 2009 मध्ये दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2016 मध्ये वसंत कुंज येथे एका महिलेने त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तथापि, चैतन्यानंद यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.









