वार्ताहर /नंदगड
नंदगड ग्रामपंचायतीने गावात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, शौचालय बांधणी, शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता, व्यवस्थापन, आरोग्य सेवेची तरतूद केली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेअंतर्गत विविध उपक्रम उत्तमप्रकारे राबविले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 च्या सर्वेक्षणात जिह्यात अधिक अंक घेतल्यामुळे नंदगड ग्राम पंचायतीची राज्य पातळीवर निवड झाली आहे. त्यामुळे सोमवारी बेंगळूर येथील विशेष कार्यक्रमात पंचायत राज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते नंदगड ग्रामपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आमदार, पंचायत खात्याचे वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. नंदगड ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, सदस्य लक्ष्मण बोटेकर, पीडिओ सागरकुमार बिरादार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळाल्याने नंदगड ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









