स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी (swabhimani shetkari sanghatana) गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात लोकसभेच्या हातकणंगलेसह 5 ते 6 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते आज आपल्या पक्षाच्या अभ्यास शिबिराच्य़ा सांगता समारंभात बोलत होते.
आपल्या कार्यकारणीला संबोधित करताना ते म्हणाले, “यापुर्वी आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो होतो. त्यानंतर भाजपमधून बाजूला झालो. स्वाभिमानीचा शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, आणि समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने संघर्ष सुरु असून रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार लोकशाहीच्या विरोधात असून लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही” असा समज त्यांनी सरकारला दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे महत्वाचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजूनही प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. असेही ते म्हणाले. या अभ्यास कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.