उसाचे 10 ट्रॅक्टर रोखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली
शाहुवाडी प्रतिनिधी
मागील तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये प्रमाणे द्यावे ,तरच उसाचे कांडे तोडावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहूवाडी तालुक्यात ऊस तोडी रोखल्या. विश्वास सहकारी साखर कारखान्याला जाणाऱ्या दहा ऊसाच्या ट्रॉल्या अडवून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
ऊस दराचे कोणतेच धोरण स्पष्ट नाही त्याबरोबरच मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये प्रमाणे द्यावे . या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विश्वास सहकारी साखर कारखान्याकडे जात असलेल्या ऊसाने भरलेल्या दहा ट्रॅक्टर ट्रॉली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परत फिरवून रोखल्या . तर अन्य ठिकाणी सुरू असलेल्या तोडी थांबवण्याचा इशारा दिला आहे .माजी खासदार राजू शेट्टी हे ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत . आक्रोश पदयात्रा काढून कारखानदारांना जाब विचारत आहेत . मात्र अद्यापही याकडे कारखानदारांनी अथवा शासनाने लक्ष दिलेले नाही . यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे . त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत तालुक्यात सुरू असलेल्या ऊस तोडी पूर्णपणे थांबवल्या आहेत . जर यापुढे ऊस तोडी सुरू राहिल्या तर याहीपेक्षा आक्रमकपणे तोडी थांबवल्या जातील असा इशाराही स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
तुरुकवाडी मार्गे विश्वास साखर कारखान्या कडे निघालेल्या दहा उसाने भरलेल्या ट्रॉल्या संघटनेचे कार्यकर्त्य राजू केसरे, संजय पाटील, बाजीराव पाटील, भारत पाटील, प्रकाश कांबळे, बळी पाटील, हरी पाटील, सुभाष पाटील, आदी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस ट्रॉली रोखून आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली .