कोपार्डे, वाकरे, बालिंगे कार्यालयांना कुलूप
वाकरे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदरावर झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांनी दराचा तोडगा निघेपर्यंत हंगाम सुरु करु नये, असा इशारा दिला आहे. त्यातूनच स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन कोपार्डे, वाकरे, कळे, बालिंगा शेती गट कार्यालयांना टाळे ठोकले. डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली.
जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी यावर्षीच्या उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये द्यावेत, असा ठराव केला आहे. कारखानदार दर जाहीर करेपर्यंत कारखाने सुरू करू नये, असा आदेश त्यांनी दिला आहे. पण कारखानदारांनी शेट्टींच्या मागणीला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना ऊस वाहतूक रोखण्याचे आदेश दिले. परिणामी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
गेले चार दिवस दालमिया, डी. वाय. पाटील साखर कारखान्याची ऊस वहातूक रोखली आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर, बाजीराव पाटील, पांडुरंग केंबळेकर, सुनिल कापडे, भिवाजी खाडे, यांनी कोपार्डे, कळे, बालिंगा, वाकरे येथील दोन कारखान्याच्या शेती गट कार्यालयातील कर्मचारांना बाहेर काढून टाळे ठोकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते व कर्मचायांत बाचाबाची झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे दिवसभर परिसरात ऊस वाहतूक थांबल्याचे चित्र होते.








