स्वायटेक, रुबलेव्ह, सिनर, डिमिट्रोव्ह यांचेही विजय, अझारेन्का, शॅपोव्हॅलोव्ह, बेन्सिक स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
एलिना स्विटोलिना, इगा स्वायटेक, आंद्रे रुबलेव्ह, रोमन सफिउल्लिन, यानिक सिनर, जेसिका पेगुला यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर ग्रिगोर डिमिट्रोव्ह, मायरा अँड्रीव्हा यांनी चौथी फेरी गाठली. व्हिक्टोरिया अझारेन्का, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, बेलिंडा बेन्सिक, अॅनास्तेशिया पोटापोव्हा, अलेक्झांडर बुबलिक यांचे आव्हान संपुष्टात आले.
युक्रेनच्या स्विटोलिनाने बेलारुसच्या अझारेन्कावर 2-6, 6-4, 7-6 (11-9) अशी दोन तास 46 मिनिटांच्या लढतीत मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सामन्यानंतर स्विटोलिनाने निषेध म्हणून अझारेन्काशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्याला बेलारुसचा पाठिंबा असल्याने त्याच्या निषेधार्थ तिने हे कृत्य केले. यावेळी प्रेक्षकांनीही अझारेन्काची टर उडविली. जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या स्वायटेकने ऑलिम्पिक चॅम्पियन बेलिंडा बेन्सिकवर संघर्षपूर्ण लढतीत 6-7 (4-7), 7-6 (7-2), 6-3 अशी मात केली. स्वायटेक व स्विटोलिना यांच्यात उपांत्यपूर्व लढत होणार आहे.
16 वर्षीय रशियाच्या मायरा अँड्रीव्हाने आपली स्वप्नवत घोडदौड पुढे चालू ठेवताना आपल्याच देशाच्या 22 व्या मानांकित पोटोपोव्हाचा पराभव करून चौथी फेरी गाठली. युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोला जागतिक चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने 6-1, 6-3 असे पराभूत केले. तिची लढत मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाशी होईल. व्होन्ड्रूसोव्हाने झेकच्या मेरी बुझकोव्हाचा -6, 6-4, 6-3 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत आंद्रे रुबलेव्हने कझाकच्या 23 व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकवर 7-5, 6-3, 6-7 (6-8), 6-7 (5-7), 6-4 अशी मात केली. रुबलेव्हची उपांत्यपूर्व लढत जोकोविच व ह्युबर्ट हुरकाज यापैकी एकाशी होईल. या दोघांची लढत नाईट कर्फ्युमुळे अर्धवट थांबवण्यात आली. त्यावेळी जोकोविचने दोन सेट्स जिंकले होते. जागतिक क्रमवारीत 92 व्या स्थानावर असणाऱ्या रोमन सफिउल्लिनने धक्कादायक निकाल देताना कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हचा 3-6, 6-3, 6-1, 6-3 असा धुव्वा उडविला. त्याची पुढील लढत यानिक सिनरशी होईल. आठव्या मानांकित इटलीच्या सिनरने कोलंबियाच्या डॅनियल इलाही गॅलनचा 7-6 (7-4), 6-4, 6-3, असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने या सामन्यात 12 बिनतोड सर्व्हिस केल्या. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ग्रिगोर डिमिट्रोव्हने दहाव्या मानांकित फ्रान्सेस टायफोचा 6-2, 6-3, 6-2 असा फडशा पाडत चौथी फेरी गाठली.