दापोली / मनोज पवार :
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील ‘सुवर्णदुर्ग’ या जलकिल्ल्याचा अखेर ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाला उधाण आले आहे. सुवर्णदुर्गबरोबरच महाराष्ट्रातील अन्य 11 व महाराष्ट्राबाहेरील तामिळनाडूतील ‘जिंजी’ किल्ल्याचाही या यादीत समावेश झाला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता संपूर्ण जगाला माहित होईल, अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.
‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक देश नामांकन पाठवतो. यावर्षी मराठाकालीन किल्ल्यांचा प्रस्ताव भारताकडून ‘युनेस्को’कडे पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोला नामांकन पाठवले होते. या किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे.
- राज्य शासनाच्या प्रयत्नांना यश
भारताने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत मराठाकालीन किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील होते. आता त्यात यश आले असून देशभरातील 12 राज्यांमधून महाराष्ट्रातील किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचेल.








