गाझियाबादजवळ दिल्ली- मेरठ द्रुतगती मार्गावर स्कूल बस आणि एसयूव्ही कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या चालकाने चुकीच्या महामार्गावर बस चालवल्याने बस चालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमधील सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील होते. तर बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही पोलिसांनी सांगितले.
अपघाताबद्दल अधिक माहीती देताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आरके कुशवाह म्हणाले, “दिल्लीतील गाझीपूर येथून सीएनजी भरल्यानंतर बस चालक चालकाने चुकीच्या दिशेने बस चालवली. त्याच वेळी मेरठच्या दिशेने येणारी एसयूव्ही गुरुग्रामकडे निघाली होती. या अपघातामध्ये बस चालकाची चूक असून तो दिल्लीहून चुकीच्या दिशेने येत होता. त्याला पकडण्यात यश आले आहे. कारमधील प्रवासी एकाच कुटुंबातील असून बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.