दुहेरीत दोन भारतीय जोड्या उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /प्याँगचँग, द.कोरिया
भारताच्या सुतीर्था मुखर्जीने आपल्यापेक्षा वरचे मानांकन असणाऱ्या झु यु चेनचा पराभव करून येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. दुहेरीत भारताच्या दोन जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत 104 व्या स्थानावर असणाऱ्या सुतीर्थाने पहिला गेम गमविल्यानंतर मुसंडी मारत 40 व्या मानांकित चेनवर 10-12, 11-8, 11-7, 11-7 असा पराभव केला. भारताची अव्वल खेळाडू मनिका बात्राने मात्र थायलंडच्या जिनिपा सवेताबटला पुढे चाल दिली. ऐहिका मुखर्जीने नेपाळच्या सुवल सिक्काचा 11-2, 11-0, 11-1 असा धुव्वा उडविला. आणखी एक भारतीय श्रीजा अकुलाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या मिमा इटोकडून तिला 5-11, 6-11, 9-11 असा पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या जागतिक द्वितीय मानांकित चेन मेंगने भारताच्या दिया चितळेचे आव्हान 11-3, 11-6, 11-8 संपुष्टात आणले.दुहेरीत भारताच्या दोन जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मानव ठक्कर व मानुश शहा यांनी उझ्बेकच्या अब्दुलअझिझ अनोरबोएव्ह व कुतबिदिल्लो तेशाबोएव्ह यांचा पराभव करून पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला विभागात ऐहिका व सुतीर्था यांनी कझाकच्या अँजेलिना रोमानोवस्काया व सर्विनोझ मिर्कादिरोव्हा यांच्यावर 11-1, 13-11, 10-12, 11-7 अशी मात करून शेवटच्या आठ फेरीत स्थान मिळविले. सांघिक विभागात भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळविले आहे.









