पंतप्रधान मोदींचे वक्तव्य : वाराणसीत जी-20 ची बैठक
वृत्तसंस्था/ वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जी-20 विकास मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले आहे. ही बैठक वाराणसीत आयोजित झाली असून यात मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला आहे. काशी शतकांपासून ज्ञान, चर्चा, संस्कृती आणि अध्यात्माचे केंद्र राहिली आहे. जी-20 चा विकासाचा अजेंडा काशीपर्यंत पोहोचल्याने आनंदी झालो आहे. विकास हा ग्लोबल साउथसाठी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
ग्लोबल साउथचे देश कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे गंभीर स्वरुपात प्रभावित होते. भू-राजनयिक तणावामुळे अन्नधान्य, इंधन आणि खत संकटामुळे या देशांना आणखी एक झटका बसला. अशा स्थितीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचे मोठे महत्त्व असते. विकास लक्ष्यांची प्राप्ती ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. निरंतर विकास लक्ष्याच्या दिशेने होणारी वाटचाल मंदावू नये. तसेच या वाटचालीत कुणीच मागे पडू नये हे देखील आम्हाला सुनिश्चित करावे लागेल असे मोदींनी म्हटले आहे.
भारतात डिजिटलायझेशनने क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. तंत्रज्ञानाचा वापर लोकांना सशक्त करण्यासाठी केला जात आहे. आम्ही अन्य देशांसोबत स्वत:चा अनुभव शेअर करू इच्छितो. आमचे प्रयत्न व्यापक, सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि शाश्वत असणे गरजेचे आहे. भारतात आम्ही 100 हून अधिक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये लोकांचे जीवनमान सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत असे मोदी म्हणाले.
वाराणसी येथील बैठकीला 20 देशांचे 200 हून अधिक प्रतिनिधी सामील झाले. या बैठकीला संबोधित करताना मोदींनी काशीमधील ऊर्जेचा उल्लेख केला, तसेच ग्लोबल साउथमधील भू-राजनयिक तणावाचा मुद्दा उपस्थित केला. काशीमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण वारशाचे सार आहे, काशी हे देशाच्या सर्व हिस्स्यांच्या लोकांसाठी मध्यबिंदूप्रमाणे काम करते. जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहर वाराणसी हे लोकशाहीला जन्म देणारे आहे. काशी ज्ञानाचे केंद्र आहे, चर्चा, वादविवाद, संस्कृती आणि अध्यात्मिकता सर्वकाही येथे शेकडो वर्षांपासून नांदत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.









