कोल्हापूर :
शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी लागावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, सृजनशीलता वाढावी या हेतूने बाल वैज्ञानिक प्रदर्शन भरविण्यात येते. यंदा रा. ना. सामाणी विद्यालयामध्ये भरवलेल्या प्रदर्शनात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बालवैज्ञानिकांनी सौर उर्जा, कचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक कंट्रोल यंत्र यासह आपण घरात नसताना पाऊस आला तर आपोआप कपडे घरात घेणारा सेंसॉर बनवला आहे. हेच या प्रदर्शनातील वेगळेपण असल्याचा अनुभव आला. बाल वैज्ञानिकांनी तयार केलेल्या उपकरणांना भविष्यात पेटंट मिळणार यात शंका नाही.
महाराष्ट्र शासनाच्याआदेशानुसार रा. ना. सामाणी विद्यालयात घेतलेल्या शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी मांडलेली उपकरणे पाहून भविष्यात मोठे शास्त्रज्ञ होतील यात शंका नाही. भविष्यकालीन शिक्षणाचा वेध घेत सध्याच्या संगणक युगातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सक्षम विद्यार्थी तयार व्हावा व प्रत्येक मुलाच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना संधी मिळावी या उद्देशाने हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:ची कौशल्ये वापरून पाणी व आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सौर उर्जा, शेतकऱ्यांसाठी लिंबू वर्गीकरण, व्हॅक्युम क्लिनर, अनिमल सेल, एकमार्ग वाहतुक नियंत्रण, व्हाईस कंट्रोल इलेक्ट्रिक डिव्हाईस युजिंग आर्डीनो, शेंद्रीय शेती अशा विविध विषयावर वैज्ञानिक उपकरणे मांडली आहेत. हा बालवैज्ञानिकांचा मेळा पाहून भारतात भविष्यात शाश्वत विकास घडवणारे वैज्ञानिकच एकत्र आले आहेत, असे वाटते. विद्यार्थ्यांचे पालक, विज्ञान प्रेमींनी भेट देऊन विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांचे कौतुक केले.
रा. ना. सामाणी विद्यालयात शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. बाल वैज्ञानिकांच्या उपकरणांची पाहणी केल्यानंतर शिक्षणाधिकारी, शिक्षकांनी कौतुक केले. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी, दिव्यांग असे विद्यार्थ्यांचे चार गट होते. तर शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर असे दोन गट होते. विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल आज (दि. 27) दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे.








