पाठलाग करताच कार सोडून संशयिताचे पलायन
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात संशयास्पद वस्तू कारागृहाबाहेरून टाकल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून वस्तू टाकणारे तेथून पलायन केले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाबाहेर कारागृह अधिकारी व केएसआयएसएफच्या अधिकाऱ्यांचा वावर सुरू होता. त्यावेळी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच जवळच असलेल्या श्री गणेश मंदिराजवळून कारागृहाच्या आत संशयास्पद वस्तू टाकली आहे.
टिक्सोटेपने या वस्तू गुंडाळून बांधल्या होत्या. त्यामध्ये नेमके काय आहे? याचा उलगडा झाला नाही. कारागृहाच्या भिंतीवरून आतमध्ये संशयास्पद वस्तू टाकल्याची घटना उघडकीस येताच वस्तू टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते तेथून पळून गेले. अधिकाऱ्यांनी पाठलाग केल्यामुळे वस्तू टाकणाऱ्याने आपली कार तेथेच सोडून पळाला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. संशयास्पद वस्तू टाकणारा कोण? याचा शोध घेण्यात येत आहे.









