वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या युद्ध विमानांनी अलास्का येथे आकाशात उडणारी एक वस्तू पाडविली आहे. ही वस्तू एका कारच्या आकाराची होती. ते हेरगिरी करणारे उपकरण होते असा संशय असून ती चीनने पाठविलेली असावी असेही मानले जाते. अद्याप या वस्तूची तपासणी करण्यात आलेली नाही. तपासणीनंतर तिचे खरे स्वरुप स्पष्ट होईल, अशी माहिती अमेरिकेच्या वायुदलाने दिली.
ही संययास्पद वस्तू आकाशात 40 हजार फूट उंचीवर उडत होती. याच उंचीवरुन सर्वसाधारणपणे नागरी विमाने उडतात. त्यामुळे ही वस्तू अशा विमानांना धोका ठरु शकणार होती. तो संभाव्य धोका टाळण्यासाठी ती पाडविण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले. चार दिवसांपूर्वी चीनचा एक आकशस्थ फुगाही अमेरिकेने पाडविला होता. यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध मोठय़ा प्रमाणात ताणले गेले असून चीनने अमेरिकेला ‘परिणाम भोगावे लागतील’ असा इशारा दिला आहे. मात्र अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.









