चारच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह : माहेरच्यांकडून तक्रार दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे (ता. बेळगाव) येथील एका नवविवाहितेचा मृतदेह तिच्याच घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पतीसह सासरच्या मंडळीनीच तिचा खून करून गळफास लावल्यासारखे भासवल्याचा आरोप करीत त्या नवविवाहितेच्या माहेरवासियांनी खुनाची तक्रार दिली आहे.अनिता निलेश नंद्याळकर (वय 25) असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. केवळ चार महिन्यांपूर्वी तिने निलेशबरोबर प्रेमविवाह केला होता. शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता ही घटना उघडकीस आली असून, अनिता गर्भवती होती. तिचे वडील हणमंत आत्माराम कांबळे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल
अनिताचा पती निलेश नंद्याळकर, सासरा यल्लाप्पा नंद्याळकर व नणंद या तिघा जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
लग्नाला निलेशच्या कुटुंबीयांचाही विरोध
अनिता व निलेश हे दोघे मच्छे गावचेच आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. चार महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. या लग्नाला निलेशच्या कुटुंबीयांचाही विरोध होता. आपण आंतरजातीय लग्न केल्यामुळे कुटुंबीयांनी आपल्याला लग्नानंतर दूर ठेवले आहे, या भावनेत निलेश वावरत होता.
शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 7 यावेळेत ही घटना घडली आहे. गळफास लावलेल्या अवस्थेत अनिताचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अनिताचे माहेरवासीय सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागाराबाहेर जमा झाले. त्यांनी पती व सासरच्या मंडळीविरुद्ध एकच आक्रोश व्यक्त केला. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









