माहेरच्या कुटुंबीयांकडून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
बेळगाव : सुळेभावी (ता. बेळगाव) येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून माहेरच्या मंडळींनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. प्रेमा गणपती व्हसमनी (वय 31) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री 1 ते 2 यावेळेत ही घटना घडली आहे. पती गणपती विरुद्ध भादंवि 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला आत्महत्येचा प्रकार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. मात्र, कुटुंबीयांनी खुनाची फिर्याद दाखल केली आहे.
तेरा वर्षांपूर्वी गणपती व प्रेमा यांचे लग्न झाले आहे. पतीला दारूचे व्यसन जडले होते. त्याने अनेक ठिकाणांहून कर्जही उचलले होते. पतीचे कर्ज फेडण्यासाठी प्रेमाने धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघातून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. ही गोष्ट गणपतीला समजल्यानंतर त्याने पैशांसाठी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाहीत म्हणून रविवारी रात्री पतीने तिचा खून केल्याचे प्रेमाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच या घटनेची निश्चित माहिती समजणार आहे.









