प्रतिनिधी/ वास्को
सांकवाळ झुआरीनगर येथील बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. मयत विद्यार्थ्याचे नाव कुशाग्र जैन (वय 20) असे आहे.
उपलब्ध माहितीनुसार हा विद्यार्थी झोपेतच मरण पावला. तो उत्तर प्रदेश राज्यातील आहे. बिट्स पिलानीमध्ये तो अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान या शाखेचे तिसऱ्या वर्षांतील शिक्षण घेत होता. त्याचे वडील शुक्रवारी रात्रीपासून त्याच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, कुशाग्र याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. ही माहिती मिळताच संस्थेचे विद्यार्थी व इतरांनी दुपारच्या सुमारास त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता दरवाजा आतून बंद होता व आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे बाहेरूनच दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडण्यात यश आले. कुशाग्र पलंगावर मृतावस्थेतच आढळला. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वेर्णा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आहे.
सांकवाळच्या बिट्स पिलानीच्या हॉस्टेलमध्ये मागच्या नऊ महिन्यांत ताज्या घटनेसह चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी काहींनी आत्महत्या केलेल्या आहेत. वेर्णा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.








