वन्यप्राणी हल्ल्यात की इतर कारणाने मृत्यू याबाबतचा शोध सुरू : शेतकऱ्यांत भीती
खानापूर : तालुक्यातील घोसे खुर्द येथील एका शेतकऱ्याचा जंगलात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या शेतकऱ्याचा मृत्यू जंगली श्वापदाच्या हल्ल्यात की इतर कारणाने झाला असल्याचा तपास नंदगड पोलीस करत आहेत. उत्तरीय तपासणी अहवालानंतरच खरे कारण समजणार असल्याचे खानापूर विभागीय वनाधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले. याबाबतची माहिती अशी की, लेंढा वनविभाग क्षेत्रातील घोसे खुर्द येथील भिकाजी इराप्पा मिराशी (वय 64) हे रोजच्याप्रमाणे शनिवारी जनावरे घेऊन शेताकडे गेले होते. त्यांचे शेत घोसे खुर्द येथील जंगलाला लागून आहे. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. रविवारी सकाळी त्यांच्या शेताजवळ त्यांचा मृतदेह काही शेतकऱ्यांच्या नजरेस पडला. याची माहिती लोंढा वनविभागाचे वनाधिकारी नागराज भीमगोळ, गुंजी वनक्षेत्रपाल राजू पवार यांना देण्यात आली.
त्यानंतर लोंढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता जंगली प्राण्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र प्रत्यक्ष पाहणी करून वनखात्याने याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना दिली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एस. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखान्यात हलविला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणी अहवालानंतरच याचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनखाते व पोलीस खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. घटनास्थळी आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांना यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन पेले. तसेच वनाधिकाऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने मिळवून देण्यात यावी, अशा सूचना केल्या. भिकाजी यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही मुले नोकरीनिमित्त गोवा येथे असतात. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे.
शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण
सध्या या भागात भात पिके पोसवणीला आली आहेत. तर माळवण भागातील पिकेही जवळजवळ कापणीला आली आहेत. जंगल भागातील भात पिके दररोज जंगली प्राण्याकडून खाऊन नुकसान होत असल्याने येथील शेतकरी रात्रंदिवस शेती रक्षणासाठी शेताकडे जातात. मात्र अनेकवेळा जंगली प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. घोसे तेथील या घटनेमुळे शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले असून ऐन सुगी काळामध्ये आपल्या शेतीचे संरक्षण कसे करावे, ही चिंता लागून राहिली आहे.









