मृताच्या वडिलांनी दिली पोलिसांत फिर्याद
प्रतिनिधी/ बेळगाव
आमटेजवळील एका रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये तरुणाच्या बुडून मृत्यूप्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा उलगडा होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रे•ाr यांनी दिली.
रविवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी आमटेजवळील एका रिसॉर्टमध्ये मित्रांसमवेत सहलीला गेलेल्या मारुती गल्ली, खासबाग येथील महांतेश अशोक गुंजीकर (वय 25) या तरुणाचा स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी महांतेशचे वडील अशोक गुंजीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
महांतेश हा एका खासगी कंपनीत काम करीत होता. त्या कंपनीतील सुमारे 22 कर्मचारी शनिवारी 28 डिसेंबर रोजी सहलीला गेले होते. आमटेजवळील एका रिसॉर्टमध्ये ते सर्वजण पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी स्विमिंगपूलमध्ये बुडून महांतेशचा मृत्यू झाला आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला सुरुवातीला जांबोटी इस्पितळात, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला हलवले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.
स्विमिंगपूलवर असे प्रकार टाळण्यासाठी जीवरक्षक तैनात करायला हवे होते. नियमानुसार फलकही लावायला हवे होते. मात्र, रिसॉर्ट व्यवस्थापनाने ते केले नाही. म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.









