दापोली :
दापोलीच्या कर्दे व मुरुड समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातून पुठ्याचे संशयास्पद रोल वाहून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे काही वेळ प्रशासनाची धावपळ उडाली.
दापोलीच्या कर्दे व मुरुड येथील समुद्रकिनारी अनेक पुठ्याचे मोठे रोल वाहून आलेले रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पुठ्याच्या वेष्टनात यामध्ये काय आहे, हे स्पष्ट होत नसल्याने ग्रामस्थांनी ही घटना तत्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही गोलाकार वस्तू काय आहे, याची पाहणी केली असता हे पुट्ट्याचे रोल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र एवढे मोठे पुठ्याचे रोल समुद्रामध्ये कुठून वाहून आले, या बाबत काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा ग्रामस्थांना दिल्यावर सर्वांनी सुटकेचा निःस्वास सोडला. हे संशयास्पद रोल पाहण्यासाठी ग्रामस्थांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती. ही बाब पोलिसांनी कोस्टगार्डला कळवल्याचे दापोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांनी स्पष्ट केले.








