माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत सीसीटीव्हीत छबी कैद : पोलीस खाते सतर्क
बेळगाव : आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीचा बेळगावात वावर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात संशयास्पद व्यक्तींचा वावर दिसून आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांची छबीही कैद झाली असून बेळगाव पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपासून या संशयास्पद व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवार दि. 28 जून रोजी दिवसा माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील श्रीनगर, अंजनेयनगर, कणबर्गी रोड परिसरात दोघा संशयास्पद व्यक्तींचा वावर आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी माळमारुती पोलिसांना ही माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयास्पद व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
खास करून चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील हे गुन्हेगार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी बेळगाव पोलिसांनी संपर्क साधून त्यांची माहिती जमवली आहे. हुबळी, हासन येथे या जोडगोळीने चोरी केल्याचेही उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या सूचनेवरून गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी काटेकोरपणे तपासणी करून या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे. दिवसा फिरून बंद घरांची टेहळणी करायची व रात्रीच्या वेळी चोरी करायची, अशी यांच्या गुन्ह्याची पद्धत असावी, असा संशय आहे. या संशयितांविषयी कोणालाही माहिती आढळल्यास जवळचे पोलीस स्थानक किंवा 112 शी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.









