दिवाडीवासियांची पुन्हा म्हार्दोळ पोलीस स्थानकावर धडक : परेशच्या पत्नीला वाचविण्यासाठी पोलिसांचे वेळकाढू धोरण,आश्वासने न पाळल्याने पोलिसांचा खोटारडेपणा उघड
फोंडा : फेंड्याचे पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना मंगळवारी संतप्त दिवाडी ग्रामस्थांनी घातलेल्या घेरावानंतर अटकेत असलेला मर्सिडीझचा मद्यधुंद चालक परेश सिनाय सावर्डेकर याच्या पत्नीला जबानीसाठी हजर करण्याचे दिलेले आश्वासन काल बुधवारीही खोटे ठरले. म्हार्दोळ पोलीस स्थानकासमोर अपघातग्रस्त फडते दांपत्याच्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने हजर राहिलेले दिवाडीचे ग्रामस्थ तसेच कुंभारजुवे मतदारसंघातील ‘आप’चे नेते समिल वळवईकर या सर्वांत आणखी संताप निर्माण झाला. परेश याच्या पत्नीला पोलीस अभय देऊ पाहत असल्याचा आरोप जमावाने करुन पोलिसांचा निषेध केला. पोलिसांच्या डिलाईमुळेच तीन निष्पाप बळी घेणाऱ्या पती-पत्नीला अभय मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. या भीषण अपघाताला संयुक्तपणे जबाबदार असलेली परेशची पत्नी मेघना सावर्डेकर हिला पोलिसांनी वेळेत ताब्यात न घेतल्याने तिला फोंडा उपजिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी वेळ मिळाला. त्यावर मेघना यांना तूर्त अटक करू नये, असे कोर्टाने निर्देश दिले आहे. पुढील सुनावणी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. रविवारी अपघात घडलेल्या रात्रीपासून पोलीस अधीक्षक व म्हार्दोळ पोलिसांचा खोटारडेपणा पुन्हा पुन्हा उघड झालेला आहे. तसेच श्रीमंतांच्या प्रकरणी पोलिसांची भूमिका नेहमीच संशयास्पद असते, याचा पुन्हा एकदा या प्रकरणातही प्रत्यय आला.
परेशच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ
श्रीrपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याला काल बुधवारी फोंड्याच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकासमोर पुन्हा हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
मेघनाला वेळ मिळावी म्हणूनच पोलिसांची दिरंगाई
दिवाडी येथील फडते कुटुंबीय व ग्रामस्थ काल बुधवारी सकाळपासून म्हार्दोळ पोलीस स्थानकावर ठाण मांडून होते. मेघना हिला अटक करण्यात यावी, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी मेघना हिला अवधी मिळावा यासाठीच पोलिसांनी तिला अटक करण्यास घाई केली नाही, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला.
उपअधीक्षक आशिष शिरोडकरांची बुधवारी दडी
या अपघातावरुन मंगळवारी झालेल्या ‘हाय व्हॉल्टेज ड्रामा’नंतर हतबल झालेले पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर काल बुधवारी मात्र म्हार्दोळ पोलीस स्थानकावर फिरकलेच नाही. त्याबद्दलही ग्रामस्थांनी संताप व्यक्त करुन त्यांचा निषेधही केला.
पोलीस स्थानकात ग्रामस्थांना अटकाव
मंगळवारी मोठ्या संख्येने आलेल्या दिवाडीवासियांची दखल घेऊन काल बुधवारी पोलीस स्थानकावर येण्यास ग्रामस्थांना अटकाव करण्यात आला. त्यांना गेटवरच अडविण्यात आले. फक्त बळी ठरलेल्या फडते दांपत्त्याचे नातेवाईक व शिष्टमंडळालाच प्रवेश देण्यात आला. दिवाडीहून पाठेंब्यासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थांना पोलीस स्थानकात प्रवेश न देता बाहेरच ठेवण्यात आले. निरीक्षक मोहन गावडे यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना 24 तासात मेघना सावर्डेकर हिला जबानीसाठी बोलावणार असे सांगतिले, तरीही ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय असल्याचे निरीक्षकांना सुनावले.
सामान्य माणूस असता तर पोलिसांनी अशीच कारवाई केली असती का? : वळवईकर
अपघातात बळी पडलेल्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देऊ असा निर्धार समील वळवईकर यांनी यावेळी व्यक्त केला. पोलीस स्वत:च्या तपासकामात मुद्दामहून त्रुटी ठेवत असून वेळकाढूपणा करत आहे. एखादा सामान्य माणूस असता तर अशीच कारवाई झाली असती का? असा संतप्त सवालही वळवईकर यांनी उपस्थित केला. दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक मोहन गावडे पोलीस स्थानकात हजर झाले. समील वळवईकर व इतरांनी त्यांची भेट घेऊन मेघनाच्या अटकेवर ते ठाम राहिले.
अपघातास तीन दिवस उलटले तरी न्याय नाही
मद्यधुंद परेश सावर्डेकर हा आपली पत्नी मेघना व तीन मुलांसह (दोन मुलगे एक मुलगी) रविवारी ओपा खांडेपार येथील नंदनवन फार्म हाऊसमध्ये पिकनिक करुन परतत असताना बाणस्तारी पुलावर त्यांच्या मर्सिडीझने पाच वाहनांना ठोकरल्याने हा भीषण अपघात झाला होता. यात बळी गेलेल्या तिघांना अद्याप न्याय मिळालेला नाही, याबाबत जनतेत पोलिसांवर संशय व्यक्त होत आहे.
दोन महिन्यांत सहावेळा तालाव
दोन महिन्यांत सहावेळा या महिलेला ओव्हर स्पिडिंगसाठी तालाव देण्यात आलेला आहे. पण यापैकी एकाही तालावाची दंडात्मक रक्कम तिने भरलेली नाही, अशी माहिती पुढे आलेली आहे. पोलीस याबाबत कानाडोळा करत असल्याबद्दलही संताप व्यक्त होत आहे. मर्सिडीझ कारगाडी मेघना सिनाय सावर्डेकर हिच्या नावावर असून याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी दिवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.









