मध्यप्रदेशात सरकारकडून कठोर कारवाई
वृत्तसंस्था/भोपाळ
मध्यप्रदेशच्या सीधी येथे मनोरुग्ण असलेल्या आदिवासी युवकावर लघुशंका करणाऱ्या प्रवेश शुक्ला या आरोपीवर कारवाई झाली आहे. आरोपीला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. तर आरोपीच्या घरावर बुधवारी बुलडोझर चालविण्यात आला आहे. बुलडोझरने त्याचे घर पाडविण्याची कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.
आदिवासी युवकावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्वरित कारवाई केली होती. मुख्यमंत्र्यांनी आरोपी युवकाला अटक करण्यासोबत त्याच्या विरोधात एनएसए अंतर्गत गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. सीधीचे पोलीस अधीक्षक रविंद्र वर्मा यांच्यानुसार आरोपी प्रवेश शुक्ला विरोधात कलम 294, 504 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रवेश शुक्लाने मद्यधुंद अवस्थेत आदिवासी युवकावर लघुशंका केली होती.
प्रशासनाकडून घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात येणार असल्याचे कळल्यावर आरोपीच्या आईने मुलाने चुकीचे काम केले असल्याने शिक्षा त्याला हवी, आमचे घर पाडू नका अशी विनंती केली. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी आर.पी. त्रिपाठी यांनी घराच्या निर्मितीतील सुमारे एक तृतीयांश हिस्सा अवैध असल्याने तो पाडला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आरोपी प्रवेश हा सीधीपासून 20 किलोमीटर अंतरावरील कुबरी गावचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी प्रवेश याच्या कृत्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचे सांगितले आहे.
भाजपकडून चौकशी समिती
संबंधित घटनेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष बी.डी. शर्मा यांनी आदिवासी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रामलाल रौतेल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती याप्रकरणी चौकशी करत भाजप प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करणार आहे. या समितीत आमदार शरद, अमर सिंह आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष कांतदेव सिंह यांना सामील करण्यात आले आहे.
आमदाराचा माजी प्रतिनिधी
प्रवेशचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 10 दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी प्रवेश हा सीधी जिल्ह्dयातील भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचा प्रतिनिधी राहिला आहे. तर पीडित आदिवासी युवक हा मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्याची पुष्टी झालेली नाही.









